१७ जानेवारी, २०११

भंडारदरा


इगतपुरीहून नाशिकच्या दिशेने जाताना उजवीकडे बालेश्वर रांगेतील अलंग, कुलंग, मदन आणि कळसुबाई अशी टोलेजंग गिरिशिखरे दिसतात. या अजस्त्र पर्वतरांगांच्याच कुशीत विसावलाय भंडारदऱ्याचा देखणा आणि नैसर्गिक जलाशय. येथून जवळ बालेश्वर रांगेच्या कोकणाकडील बाजूला रतनगड हा अत्यंत सुंदर असा किल्ला आहे. या रतनगडच्या माथ्यावरील एका गुहेत प्रवरा नदी उगम पावते. ही नदी रतनगडापासून काही अंतरावर असणाऱ्या शेंडी गावात धरण बांधून अडविण्यात आली. कळसुबाई आणि बालेश्वर या दोन टेकड्यांमधील या धरणाला आज भंडारदरा नावाने ओळखले जात असले तरी पूर्वी ते विल्सन धरण म्हणूनच प्रसिद्ध होते. डोंगराळ भागातील हा जलाशय समुद्रसपाटीपासून सुमारे अडीच हजार फुटांवर असून भारतात काही मोजक्या आणि खूप उंचीवरच्या जलाशयात त्याची गणना होते. या धरणाजवळच रंधा आणि अम्ब्रेला हे धबधबे डोळ्याचे पारणे फेडतात; तर धरणाच्या दुसऱ्या टोकाला तळाशी असलेले बागबगीचेही हिरवळीचा आनंद देतात. भंडारदरा धरणापासून जवळच ११ व्या शतकातील चालुक्यकालीन हेमाडपंथी मंदिर, माचीदेवीचे मंदिर आणि पठारावरचे कळसूबाईचे मंदिर ही येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळे!  भंडारदऱ्यापासून अवघ्या कि. मी. अंतरावर महाराष्ट्राचे एव्हरेस्ट शिखर म्हणून ओळखले जाणारे कळसूबाई शिखर हे गिर्यारोहकांचे खास स्फूर्तिस्थान आहे    


येथे कसे पोहोचाल 
मुंबईहून इगतपुरी पोटमार्गाने भंडारदरा १८० कि.मी. वर असून इगतपुरी आणि घोटीहून भंडारदऱ्यासाठी नियमित बससेवा ही आहेभंडारदऱ्यापासून रंध्यापर्यंत चांगला डांबरी रस्ता असून येथेही नियमित एसटी सेवा उपलब्ध आहे. तसेच पुणे नाशिक मार्गाने संगमनेरकडूनही येथे जाता येते

कोठे राहाल?
येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विश्रांतीगृह अतिशय रम्य ठिकाणी बांधलेले आहे. येथून जलाशयाचे मनोहारी दृश्य दिसते. मुंबईत एम.टी.डी.सी. च्या केंद्रांमध्ये किमान एक आठवडा अगोदर आरक्षण करावे लागते. एम.टी.डी.सी. च्या बाजूला 'रुपमनोहर' नावाचे हॉटेल ही राहण्यासाठी भोजनासाठी माफक दरात उपलब्ध आहे.

For more info.
call : 9699510019 / 8108210921